निर्भीडसत्ता न्यूज –
एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाच्या शहर संघटन सरचिटणीसपदी प्रमोद निसळ यांची निवड केली आहे. तसेच संघटनेत यापुढे सहाऐवजी चार सरचिटणीस असतील. भाजपच्या पक्ष संघटनेतील संघटन सरचिटणीसपद हे शहराध्यक्षानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे.
एक व्यक्ती, एक पद हे भाजपचे तत्त्व आहे. त्यानुसारच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदांचे वाटप केले जाते. आमदार लक्ष्मण जगताप यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संघटनेची कार्यकारिणी निवडली. माऊली थोरात यांची संघटन सरचिटणीसपदी, तर प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, बाबू नायर आणि अमोल थोरात या पाच जणांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती. पक्षाच्या धोरणानुसार केवळ चार सरचिटणीस निवडणे आवश्यक असताना पक्षांतर्गत नाराजी नको म्हणून सहा सरचिटणीसांची निवड केली गेली.
दहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले. भाजपचे ७७ नगरसेवक निवडून आले. तसेच पाच अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेत भाजपची संख्या ८२ झाली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या. त्यानुसार भाजपने शहर संघटन सरचिटणीस माऊली थोरात, सरचिटणीस बाबू नायर आणि अॅड. मोरेश्वर शेडगे यांना स्वीकृत नगरसेवक केले. त्यामुळे एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार माऊली थोरात आणि बाबू नायर यांच्याकडील शहर संघटनेतील पद जाणार हे निश्चित होते.
त्यानुसार भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहर कार्यकारिणीत संघटनात्मक फेरबदल केले आहेत. सरचिटणीस प्रमोद निसळ यांना बढती देऊन त्यांची संघटन सरचिटणीसपदी निवड केली आहे. तसेच संघटनेत यापुढे चारच सरचिटणीस असतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवक बाबू नायर यांचेही सरचिटणीसपद कमी करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपच्या कार्यकारिणीत प्रमोद निसळ संघटन सरचिटणीस तसेच सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर आणि अमोल थोरात हे तिघेजण सरचिटणीस असतील.