निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूर / प्रतिनिधी
ePoS मशिन्सद्वारे एप्रिल 2017 पासून कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. याचाच पुढचा महत्त्वाचा टप्पा या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे. AEPDS नावाने ओळखल्या जाणा-या नव्या प्रणालीमध्ये आता रेशन कार्ड धारकाची ePoS मशिनवर अंगठा देऊन आधार पडताळणी झाली तर आणि तरच त्याला धान्य वाटप होऊ शकणार आहे.
आतापर्यंत आधार पडताळणी होऊ शकली नाही तरी ePoS मशिन्सवर तशी नोंद घेऊन धान्य वाटप करता येत होते. आता मात्र आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीची संपूर्ण तयारी कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने करण्यात आली असून, त्यासाठी रेशन दुकानदारांसह सर्व प्रशासकीय यंत्रणांसाठी प्रात्यक्षिक सराव व प्रशिक्षण वर्गांचे जिल्हा व तालुका पातळ्यांवर आयोजन करण्यात येऊन आजपासून ही प्रणाली कोल्हापूर जिल्ह्यात पुर्णपणे कार्यान्वित होत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी स्पष्ट केले आहे.
जर एखाद्या रेशन कार्ड धारकाची आधार क्रमांकाची नोंद ePoS मशिनमध्ये झालेली नसेल अथवा कोणत्याही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे आधार पडताळणी होऊ शकली नाही तर eKYC व ‘रूट ऑफिसर’ च्या व्यवस्थेअंतर्गत जागेवरच त्यावर मार्ग काढण्यात येऊन कोणीही पात्र रेशन कार्ड धारक धान्य मिळण्यापासून वंचित रहाणार नाही याची संपूर्ण दक्षता घेण्यात आल्याचे सांगून या नव्या प्रणालीमध्ये कोल्हापुर जिल्हा संपूर्ण राज्यात आपली आघाडी कायम ठेवील आणि अन्न सुरक्षे अंतर्गत ख-याखु-या लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शक पद्धतीने अन्नधान्य पोहोचविण्याच्या प्रयत्नांना सर्व संबंधित घटकांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी व्यक्त केला आहे.
शासनाच्या या नव्या AePDS प्रणालीची जमेची बाजू आणि वैशिष्ट्ये ही आहेत
1) रेशन कार्ड धारकाच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Data Entry करताना फरक पडला तरी आता त्याचा आधार क्रमांक असल्यास त्याच्या आधार पडताळणीला अडचण येणार नाही.
2) ‘बेस्ट फिंगर’ च्या सुविधेमुळे आता एकाहून अधिक बोटांचा वापर ePoS मशिनवर आधार पडताळणीसाठी करता येणार आहे.
3) या नव्या प्रणालीमधील ‘पोर्टेबिलीटी’ च्या सुविधेमुळे उदरनिर्वाहानिमित्त तात्पुरत्या स्थलांतरीत रेशन कार्ड धारकांना त्यांच्या सोयीच्या कोणत्याही रेशन दुकानातून ePoS मशिनवर अंगठा देऊन धान्य घेता येणार आहे.
4) या प्रणालीमध्ये रेशन दुकान व रेशन कार्ड निहाय सर्व प्रकारचे Online Reports मिळणार असून 100% पारदर्शकता येणार आहे.