निर्भीडसत्ता न्यूज –
मिथीला प्रदेश म्हणजे सीतामातेची जन्मभूमी आहे. येथील मातीची पवित्रता आजही कायम आहे. मैथीली भाषा, परंपरा, मधुबनी पेंटींग आणि संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. मिथीला विकास मंच यासाठी कार्यरत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.
मिथीला विकास मंच, पुणे यांच्यावतीने भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात नुकताच हा कार्यक्रम झाला. त्यावेळी पक्षनेते एकनाथ पवार बोलत होते.
महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मिथीला विकास मंचचे अध्यक्ष मिहिर झा, डीआरडीओचे वैज्ञानिक मृदकांत पाठक, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, उपाध्यक्ष नेताजी सिंह आदी या वेळी उपस्थित होते.
शिक्षण आणि रोजगारानिमित्त पिंपरी-चिंचवडसह पुण्यात मोठ्या प्रमाणात मैथीली भाषक स्थायिक झाले आहेत. बिहार आणि झारखंड राज्यातून आलेल्या या मैथीली भाषक बांधवांसाठी फागोत्सव अर्थात होली मिलन समारोह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मैथीली भाषेसह विविध चित्रपट गीतांनी या कार्यक्रमात रंगत भरली. एकमेकांना गुलाल लावत गाण्यांवर ठेका धरत मैथीली भाषक बांधवांनी या उत्सवाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमात मैथीली गायक माधब राय, स्मृती मिश्रा ठाकूर, कंचन पांडे, शिखा झा, रामबाबू झा यांनी विविध गाणी सादर केली. या बहारदार आणि दिलखेचक गाण्यांवर मैथीली भाषक बांधवही थिरकले. बहुगुणी कलाकार रामसेवक ठाकूर यांनी मिमिक्री करून अनेक किस्से रंगवत सभागृहात हास्य फुलविले. मैथीली भाषक महिलाही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनीही एकमेकींना गुलाल लावत फोगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
मैथीली भाषकांसाठी बहुपयोगी असलेल्या www.maithilpune.com या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. मैथीली भाषकबांधवांना रोजगाराच्या संधीबाबत या माध्यमातून मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार आहे. विवाहयोग्य वधू-वरांचा परिचय आणि त्यांचा विवाह घडवून आणण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.