निर्भीड न्यूज
माझ्या कार्यकाळात पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. शहरातील सर्व पत्रकारांनी मला कायम सांभाळून घेतले. त्याचप्रमाणे मला सभाधिट आणि बोलते करण्याचे काम पत्रकारांनीच केले आहे. असे मत पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर शकुंतला धराडे यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष एस.एम.देशमुख यांचा सत्कार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने महापौर धराडे यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 26) करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे , मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य सुनिल वाळूंज , प्रशांत साळुंखे, सुनील कांबळे, प्रवीण शिर्के, विनायक गायकवाड, अनिल वडघुले, सुनील वडमारे, अनिल भालेराव, विनय लोंढे यासह पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेषी संलग्न असलेल्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी नवनियुक्त अध्यक्ष सायली कुलकर्णी यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.
महापौर धराडे म्हणाल्या कि, पत्रकार संघाच्या सध्याच्या सर्व जिल्हा व तालुका संघांमध्ये पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने महिला अध्यक्ष म्हणून सायली कुलकर्णी यांची केलेली नियुक्ती अभिनंदनीय आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना छोटी जिल्हा दैनिके आणि साप्ताहिके यांना सरकारने मदत केली पाहिजे असे मत मांडले. ते पुढे म्हणाले की, जाचक अटी आणि नियम बदलून छोटया वृतपत्रांना जगविले पाहिजे. मोठमोठे उद्योग माध्यमांमध्ये शिरकाव करु लागली आहेत. त्यांच्याकडील साधन संपत्ती आणि वजन वापरुन ते मोठे होतीलच त्याच बरोबर छोटया वृतपत्रांना या स्पर्धेत टिकाव धरता यावा म्हणून सरकारने त्यांना विविध प्रकारे सहकार्य करावे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी केले. आभार नवनियुक्त अध्यक्षा सायली कुलकर्णी यांनी मानले.