निर्भीडसत्ता न्यूज- वन-डे विश्वचषकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे पाय अवघ्या काही दिवसांमध्येच जमिनीवर आले आहेत. आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या ८५ धावांवर गारद झाला. लॉर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. आयर्लंडच्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय चांगलाच फसला. सलामीवीर जेसन रॉय आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा जोए डेन्ली झटपट माघारी परतले. पाठोपाठ रोरी बर्न्सही माघारी परतला. टीम मुर्ताघने सुरुवातीच्याच षटकांमध्ये यजमान इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीने पुरती निराशा केली. कर्णधार जो रुटसह जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि ख्रिस वोक्स हजेरीवीराची भूमिका बजावत माघारी परतले.
धावफलकावर ५० धावा लागण्याच्या आधीच इंग्लंडचे ७ फलंदाज माघारी परतल्यामुळे यजमान संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र तळातल्या फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत इंग्लंडला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. सॅम करन आणि ओली स्टोन्स यांनी इंग्लंडच्या संघाला ८५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. आयर्लंडकडून टीम मुर्ताघने ५, मार्क आदीरने ३ तर बॉय रॅनकिनने २ बळी घेतले.