अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 4 दिवसांचा कालावधी शिल्लक
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.27) एकूण 31 अर्जाचे वाटप करण्यात आले. त्यात शिवसेना व भाजपकडून प्रत्येकी 1 अर्ज आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 व काँग्रेसकडून 9 अर्ज नेण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 5 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
उमेदवारी अर्ज वाटप आणि ते अर्ज दाखल करण्याची मुदत 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अशी आहे. आज पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या प्राधिकरण, निगडी येथील डॉ. केशवराव हेडगेवार भवनातील निवडणूक निर्णय कार्यालयातून तब्बल 31 उमेदवारी अर्ज नेण्यात आले. त्यात शिवसेनेकडून अॅड. मुकुंद ओव्हाळ आणि भाजपकडून आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी प्रत्येकी 1 अर्ज नेला. सोनकांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षासाठी 2 अर्ज नेले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीनाताई खिलारे यांनी 1 आणि नगरसेवक राजू बनसोडे व उत्तम हिरवे यांनी प्रत्येकी 2 अर्ज घेतले आहेत. काँग्रेसकडून विजय ओव्हाळ व सुंदर कांबळे यांनी प्रत्येकी 1, गौतम आरकडे यांनी 3 आणि मनोज कांबळे यांनी 4 अर्ज घेतले आहेत. भापसे पार्टीकडून दीपक ताटे यांनी अर्ज घेतला आहे. तर, अपक्ष म्हणून अजय लोंढे, सुरज खंडारे, महेश तांदळे, भारत मिरपगारे, रमेश शिंदे, विवेक कांबळे, जाफर चौधरी, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी अर्ज नेले आहेत, अशी महिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी (दि.28) व रविवारी (दि.29) कार्यालयास सुटी होती. आता अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि.30) ते शुक्रवार (दि.4) असे केवळ 5 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.