निर्भीडसत्ता न्यूज ।पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 फेब्रुवारीपासून कारवाई मोहिम तीव्र केली जाणार आहे. त्या अंतर्गत दररोेज 100 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.24) सांगितले.
मोकाट व भटक्या कुत्र्यांमुळे शहरात विशेषत: बालकांना चाव्या घेण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने कुत्री पकडून त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रकिया राबविली होती. त्यानुसार 4 एजन्सीची निवड करण्यात आली आहे. एका कुत्र्यांमागे सुमारे 1 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. त्या संदर्भात पवार यांनी सांगितले की, 1 फेब्रुवारीपासून मोकाट कुत्री पकडण्याची मोहिम तीव्र केली जाणार आहे. प्रत्येक एजन्सी दिवसाला एकूण 25 कुत्री पकडून त्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करणार आहे. त्यानुसार दिवसाला 100 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार असून, महिन्याला हे प्रमाण 3 हजार इतके होणार आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 महिने ही कारवाई कायम राहणार आहे. त्यानंतर शहरातील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश मिळेल, असा दावा त्यांनी केला.