निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन बुधवारी (दि. 4) मोठ्या उत्साहात पार पडले.
पद्मभूषण राहीबाई पोपरे व झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता ऊर्फ अपूर्वा नेमाळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जत्रेचे उद्घाटन करण्यात आले. महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, महिला व बाल कल्याण सभापती निर्मला कुटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
पवनाथडी यात्रा रविवार (दि. 8) पर्यंत सुरू राहणार आहे. उद्घाटनावेळी रोबोटच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये नागरिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक स्त्रीपर्व, लक्ष्मण रेषा हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक या कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत.
यंदा पवनाथडीमध्ये पहिल्यांदाच साडेबाराशे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामध्ये 750 वस्तू विक्रीचे, 300 स्टॉल्स शाकाहारी खाद्यपदार्थांचे व 200 स्टॉल्स मांसाहारी खाद्यपदार्थांचे ठेवण्यात आले आहेत. विविध कार्यक्रम व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पवनाथडी जत्रेमध्ये येण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.