निर्भीड न्यूज –
आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे ग्रामीण पोलिस दलातील आणखी एका पोलिस अधिकाऱ्यास अटक केली आहे. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव सुखदेव कोठावळे यांना रविवार, दि. 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना अटक करण्यात आलेली आहे.
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भष्टाचार विरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी सकाळी हत्या झाली. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहा जणांना अटक केली होती. स्थानिक पोलिसांकडून तपास योग्य होत नसल्याचा आरोप करत सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर हा तपास सीबीआयकड़े देण्यात आला.
शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआय पथकाच्या समोर अनेक प्रकारची माहिती समोर येऊ लागली. यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे समोर येऊ लागल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर काही जणांच्या पॉलीग्राफ चाचणी करण्यात आल्या. शेट्टी यांच्या हत्येच्या तपासात स्थानिक पोलिसांनी केलेल्या गडबडी बाहेर आल्या. या प्रकरणाचा तपास चुकीच्या मार्गाने करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले.
सीबीआय पथकाने ग्रामीण पोलिसांच्या पोलिस ठाण्यातील संगणकातील हार्ड डिस्क, लॅपटॉप जप्त केले. अनेकांचे मोबाईल जप्त केले. तपास शेवटच्या टप्प्यात असताना सीबीआयने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करून सबळ पुराव्याअभावी तपास थांबवण्यास परवानगी मागितली.
सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी पुन्हा याचिका दाखल केल्यानंतर हा तपास सीबीआयच्या दिल्ली पथकाकडे देण्यात आला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना बुधवारी (दि. 6) अटक केली. यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलातील इतर पोलिसही सीबीआयच्या रडारावर असल्याचे स्पष्ट झाले होते.