निर्भीड न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 व्या जयंतीनिमित्त सांगवी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 20 ते रविवार, दि. 24 एप्रिलपर्यंत साज-या होणार-या या उपक्रमांतर्गत वैज्ञानिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासह रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव, औंध कॅम्प आणि परिसरातील सर्व विहार संघ, मंडळे, संस्था, महिला व पुरुष बचत गट अशा अनेक संस्थांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सांगवी येथे संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल आणि कार्याध्यक्ष राहुल काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
सांगवीतील कांबळे मैदान (पीडब्ल्यूडी मैदान) येथे सर्व कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (दि. 20) पहाटे पाच वाजता विपश्यना कार्यक्रम होईल. विपश्यनाचार्य डॉ. दत्ता कोहिनकर पाटील आणि डॉ. निखिल मेहता यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सकाळी दहा वाजता धम्मपरिषद होईल. धम्मपरिषद व बचतगटांच्या स्टॉलचे उद्घाटन तसेच त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदनाही या वेळी होईल. सायंकाळी सहा वाजता स्वागत नृत्य आणि बुद्धवंदना होईल. सव्वा सात वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ‘भारतीय संविधान व सद्य स्थिती’ या विषयावर माजी न्यायाधीश बी. जे. कोळसे पाटील यांचे व्याख्यान होईल. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी राहतील.
गुरुवारी (दि. 21) पहाटे पाच वाजता विपश्यना, सकाळी सात वाजता योगा, दुपारी दोन वाजता खुली चित्रकला स्पर्धा होईल. सायंकाळी साडेपाच वाजता ममता अंध अनाथ कल्याण केंद्राच्या अंध विद्यार्थ्यांकडून ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येईल. ‘ओबीसीचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांचे सायंकाळी सोडसात वाजता व्याख्यान होईल. इतिहासकार मा. म. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.
शुक्रवारी (दि. 22) पहाटे पाच वाजता विपश्यना, सकाळी सात वाजता योगा, दुपारी दोन वाजता महिलांसाठी खुली रांगोळी स्पर्धा होईल. सायंकाळी साडेपाच वाजता अनिल गायकवाड आणि सहकाऱ्यांचा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम होईल. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्मिती व उभारणीसाठीचे योगदान’ या विषयावर चर्चात्मक परिसंवाद होईल. आंबेडकरी साहित्यिक माजी न्यायाधीश अनिल वैद्य आणि राज्याच्या अनूसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एल. थूल या परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहतील. राज्याचे माजी गृहमंत्री भाई वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.
शनिवारी (दि. 23) पहाटे पाच वाजता विपश्यना, सकाळी सात वाजता योगा, सायंकाळी पाच वाजता बुगी-वूगी फेम ग्रुप डान्स स्पर्धा होईल. सायंकाळी सात वाजता अरविंद मोहिते यांचा ‘धम्मपद’ हा कार्यक्रम होईल.
रविवारी (दि. 24) पहाटे पाच वाजता विपश्यना, सकाळी सात वाजता योगा, सकाळी दहा वाजता रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर होईल. या शिबिरात रक्तदात्यांना पेन ड्राईव्ह भेट देण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता ‘स्वरसंध्या’ हा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल आणि कार्याध्यक्ष राहुल काकडे यांनी केले आहे.