निर्भीडसत्ता न्यूज –
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्याला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे. रॅम्पबाबत आज (शुक्रवारी) महापालिका सहशहर अभियंता राजन पाटील यांनी बैठक घेतली. त्यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी रहिवाश्यांनी दर्शविली आहे.
या बैठकीला वर्ल्ड बॅंकेच्या नुपूर गुप्ता, रेणू अनेजा, नगरसेवक शैलेश मोरे, एम्पायर इस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष एस. सी. पिंगळे, संतोष फिरु, मिनाक्षी सपकाळ, संजीव शेवाळे, हरीश लालवाणी, सुरेश व्यास आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर चिंचवडमधील एम्पायर इस्टेट येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपुलावरून वाहनांना उतरण्यासाठी व चढण्यासाठी दोन रॅम्प बांधण्यात येणार आहेत. एम्पायर इस्टेट सोसायटीत दोन्ही बाजुंनी दोन रॅम्प येणार असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होईल. ही भितीमुळे या रॅम्पला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे. त्याबाबत येथील रहिवाश्यांनी महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासोबत बैठक झाली.
रहिवाश्यांनी येथे रॅम्प तयार करणे धोकादायक असल्याचे प्रशासनाला सांगितले. एम्पायर इस्टेटमध्ये १६०० सदनिका, २०० दुकाने, २२ रो हाऊस आणि १५ बंगले आहेत. उड्डाणपूलामुळे रहिवाश्यांना त्रास होत असताना रॅम्प उतरविल्यास सोसायटीला जागा कमी पडणार नाही. तेथील भविष्यातील वर्दळ रहिवाश्यांसाठी धोकादायक ठरेल, ही भिती व्यक्त केली. प्रशासनाने कोणतेही कारण दिले, तरी हा रॅम्पला आमचा विरोध असल्याची भूमिका या रहिवाश्यांनी मांडली.