निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या रुपीनगर, त्रिवेणीनगर भागातील कचरा समस्या गंभीर बनल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे व तेथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज (शुक्रवारी) कचरा फेकत त्यांनी निदर्शने केली.
अनेक दिवसांनंतर या भागात आज कच-याची घंटागाडी आली. नगरसेविका सोनवणे व नागरिकांनी हीच घंटागाडी कच-यासह महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आणली. गाडीतील कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकून प्रशासनाचा निषेध केला. महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नांचे गांभीर्य कळावे, यासाठी हे आंदोलन केल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. वारंवार प्रशासनाकडे प्रभागातील कचरा समस्येबाबत पाठपुरावा केला आहे, परंतु महापालिका प्रशासन जाणीपुर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, असे त्या म्हणाल्या.