निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेचे मिळकत कर थकबाकीदार करसंकलन विभागाच्या रडारवर आहेत. सोळा थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ५४ लाखांची वसुली पालिकेने केली आहे. तसेच, यापुढे थकबाकीदारांवर मिळकत जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे सव्वा चारलाख मिळकतींची नोंद झाली आहे. त्यापैकी २ लाख ३८ हजार ५४६ मिळकतधारकांनी ३१ डिसेंबर २०१७ अखेर ३११ कोटी ६० लाख रुपयंचा मिळकत कराचा भरणा झाला आहे. त्यामध्ये १ लाख १ हजार १२ करदात्यांनी ११२ कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. थकबाकीसह दुस-या सहामाहीची मिळकत कराची रक्कम भरणा करण्याची मुदत ३१ डिसेंबरअखेर संपली आहे. त्यामुळे कर संकलन विभागामार्फत मोठ्या थकबाकीदारांपासून मिळकत जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
मिळकतधारकांनी तात्काळ मिळकतकराचा भरणा करुन मिळकत जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे. तसेच, महापालिकेच्या ऑनलाईन पेमेंट सुविधेद्वारे मिळकतकराचा भरणा करुन चालू वर्षाचे सामान्य करातील २ टक्के सवलतीचा लाभ मिळकतधारकांनी घ्यावा, असेही म्हटले आहे.