निर्भीडसत्ता न्यूज –
धारदार कोयत्याने वार करून एका तरुणाचा मंगळवारी (दि. २९) रात्री सव्वाअकरा वाजताच्या सुमारास चिंचवडगावात खून करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश तानाजी लांडगे (वय २४, पागेची तालीम, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रणजित बाबू चव्हाण (वय २३, वेताळनगर, चिंचवडगाव), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढाकणे, सोन्या वराडे यांच्या विरुध्द प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४रा. चिंचवडगाव) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश लांडगे मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चांद शेख याच्यासोबत चिंचवडगावातील चापेकर चौक येथून चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आकाश लांडगे याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच डोक्यात कुंडी व सिमेंटच्या गट्टूने मारले. यात तो गंभीर जखमी झाला. वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू असताना पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात आरोपी रणजित चव्हाण याच्यावर आठ आणि बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.