निर्भीडसत्ता न्यूज –
मोरवाडी येथील आरक्षण क्रमांक ९४ मधील जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात आली आहे. ही जागा लहान मुलांसाठी खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असून, त्याप्रमाणे ती तातडीने विकसित करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व अ प्रभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
याबाबत नगरसेवक तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावन हर्डीकर व अ प्रभाग कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १० मधील मोरवाडी येथील आरक्षण क्रमांक ९४ ची जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. ही जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली गेली आहे. मोरवाडी भागात खेळाचे एकही मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील तरूण, लहान मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करणे गरजेचे आहे. आता आरक्षण क्रमांक ९४ ची जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यामुळे लहान मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करणे सहज शक्य आहे. त्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मोरवाडीतील खेळाच्या मैदानाचा समावेश करून ते तातडीने विकसित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.