निर्भीडसत्ता न्यूज –
कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत दुकानांवर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.12) कारवाई करण्यात आली. कारवाईत एकूण 15 पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेच्या बांधकाम परवानगी व अधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाने ही कारवाई केली.
उड्डाणपुलाखाली व रेल्वेच्या सीमाभिंतीस लागून बिनदिक्कतपणे मोठ्या आकाराचे दुकाने अल्पावधीत थाटण्यात आली आहेत. पिंपरीकडे उतरवणार रॅम्प ते पिंपळे गुरवला जाणार्या रॅम्पर्यंत ही दुकाने बांधण्यात आली आहेत. त्यात वाहनांची स्पेअर पार्ट दुरूस्ती, जुनी वाहने विक्री, स्वीट मार्ट, खाद्यपदार्थ विक्री, पंक्चर, खासगी बस ट्रॅव्हर्स बुकींग अशी दुकाने आहेत. एकूण 15 दुकाने पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात आज दुपारी जमीनदोस्त केली. एकूण 7 हजार 42 चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.
सहशहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली 1 उपअभियंता, 2 कनिष्ठ अभियंता, 5 बीट निरीक्षक, 3 पोलिस उपनिरीक्षक, 14 पोलिस, 2 जेसीबी, 12 मजूर तसेच, भोसरी पोलिस ठाण्याचे 2 पोलिस निरीक्षक, 1 सहायक पोलिस निरीक्षक, 2 पोलिस उपनिरीक्षक व 45 पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.