निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नियमानुसार सोशल मीडिया एक्स्पर्टची नियुक्ती केली आहे. महापालिकेस गरज असल्याने हे पद मानधनावर भरण्यात आले आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
सोशल मीडिया एक्स्पर्टसाठी पालिका दरमहा 70 हजार रूपये खर्च करणार आहे. तब्बल दीड वर्षांनंतर या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या नियुक्तीस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांची विरोध केला आहे. ‘या नियुक्तीतून भाजपचा कार्यकर्ता पोसण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून लुट’ अशी टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली होती. त्या संदर्भात विचारले असता ते बोलत होते.
पवार म्हणाले की, सोशल मीडिया एक्स्पर्ट म्हणून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती तत्कालिन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्यासोबत काम केलेली आहे. ‘सारथी हेल्पलाईन’ या योजनेवर त्यांनी काम केले आहे. त्याच्या या अनुभवाचा लाभ पालिकेस व्हावा, म्हणून सोशल मीडिया एक्स्पर्टची नियुक्ती रितसर मुलाखत घेऊन करण्यात आली आहे. त्यात भाजपचा कार्यकर्ता पात्र ठरला त्यास वावगे काय आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दयात काही तथ्य नसल्याचे ते म्हणाले.