पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनेसाठी एकूण 2 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिका स्वत: करणार की, राज्य केंद्र शासनाच्या मदतीने करायचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
नदी सुधार कामांच्या संदर्भात आढावा बैठकीस ही माहिती देण्यात आली. महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी उपमहापौर राहुल जाधव, नगरसेवक तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, अधिकारी, शहरातील पर्यावरण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. नदी सुधार योजनेतील आतापर्यंत झालेल्या कामांचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.
पवना नदी पात्राच्या दोन्ही बाजूने दाट लोकवस्ती असल्याने ती नदी सुधारण्याचा खर्च अधिक असल्याचा दावा अधिकार्यांनी केला. तर, इंद्रायणी नदी काठावर कमी लोकवस्ती आहे. या प्रकल्पाच्या निधीसाठी पालिका खुल्या बाजारपेठेतून बॉण्ड विक्री करणार आहे. तशी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच, सीएसआर फंडातून निधी जमा केला जाणार आहे. राज्य व केंद्राकडून निधीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम अहमदनगरच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. काम करीत आहे.
नदी पात्रात नाले, गटारे व औद्योगिक परिसरातील सांडपाणी मिसळू नये म्हणून वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या वाहिन्या जवळच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास जोडले जाणार आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडले जाणार आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प एमआयडीसीच्या सहकार्याने उभा केला जाणार आहे.