पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने 11 वी पुरूष वरिष्ठ गट हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 11 ते 21 डिसेंबर या कालावधीत नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.1) दिली.
या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनीष आनंद, सचिव मनोज भोरे, ऑलिम्पियन अजित लाक्रा, सहायक आयुक्त सुषमा शिंदे आदी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, हॉकीस चालना देण्यासाठी स्पर्धेेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत देशातील एकूण 30 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोत्यात होणार आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करीत आयोजन केले जाईल. हॉकी खेळाला चालना देण्यासाठी पुरस्कर्त्यांनी पुढे यायला हवे. हॉकीचा सुवर्णमय पदकांचा इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी या खेळास साथ द्यावी.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख क्रीडानगरी अशी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे महापालिका आयोजन करीत आहे. हॉकीला चालना देण्यासाठी हॉकी महाराष्ट्र व ऑलिम्पियन धनराज पिल्ले यांच्याशी चर्चा सुरू आहे. राज्य, क्लब, महाविद्यालय, शालेय व स्थानिक पातळीवर स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
मनीष आनंद म्हणाले की, स्पर्धेत तीस बलाढ्य संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा अ व ब अशी दोन गटात खेळविली जाणार असून, एकूण 50 लढती होतील. शनिवारी (दि.4) नंतर संघ जाहीर करून लढतीचा ड्रॉ काढला जाणार आहे.
मनोज भोरे म्हणाले की, स्पर्धेत केवळ अधिकृत राज्य संघांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत चुरस असणार आहे. तसेच, महाराष्ट्र व पुण्यातील खेळाडूंचा संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी मेजर ध्यानचंद स्टेडिमय सज्ज आहे.