पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
जलदगतीने माहितीचा प्रसार व नागरी संवाद साधण्यासाठी महापालिकेचे सर्व विभागांनी ई-मेल बरोबरच ट्विटरचा वापर सुरू केला आहे. पालिकेची सकारात्मक प्रतिमा उंचाविण्यासाठी ट्विटर उपयुक्त ठरेल. नागरिकांनी या माध्यमातून प्रशासनाशी संवाद साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात सर्व विभागप्रमुखांना ट्विटर वापराविषयी माहिती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, पालिकेने नागरिकांकरीता व्हॉटस्अॅप- चॅट बॉट प्रणालीचा वापर सुरु केला आहे. या प्रणालीवर दररोज 100 पेक्षा अधिक व्यक्ती संवाद साधून आपल्या सूचना, तक्रारी व म्हणणे मांडतात. यामुळे प्रशासन गतीमान होण्यास मदत होत आहे. आता पालिकेच्या सर्व विभागांचे स्वतंत्र ट्विटर अकाऊंट असणार आहे. त्यामुळे त्या विभागातील नागरिकांशी संबंधित बाबी ट्विट करुन नागरिकांना त्याबद्दल अवगत केले जाणार आहे.
या माध्यमाचा उपयोग विभागप्रमुखांनी केल्यास नागरिकांच्या अडचणी, शंका यांचे निरसन जलद गतीने होऊन नागरिकांनी त्वरीत सेवा मिळू शकेल. पालिकेच्या फॉलोअर्समध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी व्यक्तिश: लक्ष घालून संवाद साधावा, असे आदेश आयुक्तांनी सर्व अधिकार्यांना दिले आहे.