चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकू 510 मतदान केंद्रांवर येत्या रविवारी (दि.26) मतदार होणार आहे. तर, 2 मार्चला थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवनात मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ईव्हीएम व यंत्रसामुग्री तयार करण्यात आली असून, अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडावी म्हणून निवडणूक विभाग खबरदारी व दक्षता घेत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदार संघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यात 3 लाख 2 हजार 946 पुरूष, 2 लाख 65 हजार 974 महिला आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यात एकूण 12 हजार 313 दिव्यांग मतदार आहेत. तर, 80 वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. तसेच, 331 अनिवासी भारतीय आणि 168 सैनिक मतदार आहेत.
मतदार संघात एकूण 510 मतदान केंद्र आहे. त्यापैकी 13 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. कमी किंवा अधिक मतदान होणे. केंद्रांच्या मतदार यादीत एका कुटुंबांची सलग नावे नसणे, बोगस मतदानांच्या तक्रारी अधिक असणे अशी मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यात मामुर्डी येथील सेंट जॉर्ज स्कूल, किवळे येथील विद्याभवन स्कूल, भोईरनगर येथील जयवंत शाळा, पुनावळे येथील मनीषा भोईर विरंगुळा केंद्र, चिंचवड गाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा, थेरगाव येथील फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय, पिंपळे सौदागर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पी. के. स्कूल, जी. के. गुरुकुल, पिंपळे गुरव येथील पालिका शाळा, विशालनगर येथील विद्याविनय निकेतन शाळा या ठिकाणच्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. एकूण 51 केंद्रांचे वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे.