- अश्विनी जगताप ३६ हजार ९१ मतांनी विजयी; राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव
चिंचवड | निर्भीडसत्ता न्यूज
चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार ९१ मतांनी पराभव केला. भाजपच्या अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते, तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते पडली. तसेच महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते पडली. दरम्यान, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना १ लाख ५० हजार ७२३ मते पडली होती. त्यावेळी त्यांनी सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांचा ३८ हजार ४९८ मतांनी पराभव केला होता. आता पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीचा ३६ हजार ९१ मतांनी पराभव केला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर २० दिवसांच्या आतच पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. निवडणुकीच्या मैदानात एकूण २८ उमेदवार होते. पण खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादीतच झाली. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचप्रमाणे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे हे अपक्ष लढत होते.
आज गुरूवारी २ मार्च रोजी मतमोजणी झाली. सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्यांदा टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. चिंचवड मतदारसंघात एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. त्यातील २ लाख ८७ हजार १४५ मतदारांनी पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या पार पडल्या. भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीअखेर त्यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते पडली. राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते, तर अपक्ष राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली. उर्वरित २५ उमेदवारांना एकूण ८ हजार २८६ मते पडली. तसेच २ हजार ७३० मतदारांनी नोटाचे बटन दाबले. या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा ३६ हजार ९१ मतांनी विजय झाला.