पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 2 हजार 237 महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्यांच्या न्याय हक्कासाठी मध्यवर्ती विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून या समितीवर अध्यक्षच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे पालिकेतील महिला कर्मचार्यांना कोणी वाली राहिला नसून, त्यांनी तक्रार कोणाकडे मांडायची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेमध्ये महिला कर्मचार्यांना सुरक्षित वाटावे. कार्यालयात कामकाज योग्य वातावरण असावे. त्यांना कोणी त्रास दिल्यास तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार विशाखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागातील महिला अधिकारी व कर्मचारी सदस्या आहेत. तर, वर्ग एकच्या महिला अधिकारी समितीच्या अध्यक्षा असतात. या समितीकडे येणार्या तक्रारींची दखल घेत समितीमार्फत चौकशी करून तक्रारदार व पिडीत महिला कर्मचार्यांना न्याय दिला जातो. या समितीवर सहआयुक्त आशादेवी दुरगुडे या अध्यक्षा होत्या. त्या 31 मार्चला निवृत्त झाल्या. तेव्हापासून या समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे.