1 कोटी 13 लाख 67 हजार 300 रूपये मोजणी शुल्क
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बाधित होणार्या रेड झोनची मोजणी महापालिका नव्याने करीत आहे. त्यासाठी 1 कोटी 13 लाख 67 हजार 300 रूपये मोजणी शुल्क भूमी अभिलेख विभागाच्या पिंपरी-चिंचवड व हवेली विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अचूक व स्पष्ट असा रेड झोनचा नकाशा उपलब्ध होणार आहे. परिणामी, रेड झोनच्या सीमेबाबतचा संभ्रम दूर होणार आहे.
देहू ऑडर्नन्स फॅक्टरी डेपो आणि दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून 2 हजार यार्ड (1.82 किलोमीटर) परिघामध्ये रेड झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. त्या भागात कोणतेही बांधकाम करता येत नाही. असा असतानाही त्या भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहे. अशी परिस्थिती असताना रेड झोनची हद्द नेमकी कोठपर्यंत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जुने किंवा बैठे घर असलेल्या रहिवाशांना नव्याने बांधकाम करता येत नाही. तसेच, त्याच्या जागेस भाव मिळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने मोजणी करून अचूक नकाशा जाहीर करावा, अशी अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे.
अखेर, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही सुरू केली. जिल्हाधिकार्यांसमेवत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकार्यांची 18 सप्टेंबर 2023 ला बैठक झाली होती. त्यात रेड झोन बाधित क्षेत्राची मोजणी करण्याचा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने भूमापन अधिकार्यांकडे विचारणा केली. पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिकार्यांकडून देहू ऑर्डनन्स फॅक्टरी डेपोच्या बाह्य सीमा भितीपासून 2 हजार यार्ड परिघातील पिंपरी-चिंचवड शहरातील मोजणी करण्यात येणार आहे. साधी मोजणी फी 1 कोटी 7 लाख 1 हजार 300 रूपये, तातडीची मोजणी फी 2 कोटी 14 लाख 2 हजार 600 रूपये, अतितातडीची मोजणी फी 3 कोटी 21 लाख 3 हजार 900 रूपये इतकी असल्याचे त्यांनी महापालिकेस कळविले आहे. महापालिका 18 ऑक्टोबर 2023 च्या पत्रानुसार साधी मोजणीसाठी 1 कोटी 7 लाख 1 हजार 300 रूपये शुल्क भरणार आहे.
तसेच, हवेली भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक हे दिघी मॅगझिन डेपोच्या बाह्यसीमा भिंतीपासून 2 हजार यार्ड रेड झोन परिसराची मोजणी करणार आहे. त्यांनी 6 लाख 66 हजार रूपये अतितातडीच्या मोजणीची फी असल्याचे 13 ऑक्टोबर 2023 ला कळविले आहे. ते शुल्कही महापालिका भरणार आहे. असे एकूण 1 कोटी 13 लाख 67 हजार 300 रूपये मोजणी शुल्क महापालिका भरणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.