पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मामुर्डी व सांगवडे या भागांना जोडणारा पवना नदीवर पुल बांधण्यात येत आहे. त्यासाठी 37 कोटी 25 लाख 91 हजार खर्चाची निविदा महापालिकेच्या स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरात काम सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
शहराच्या सीमेवर असलेल्या मामुर्डी व किवळे भागातून हिंजवडीकडे जाण्यासाठी जवळचा पुल नसल्याने रहिवाशांना मोठा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. त्यामुळे वेळ व प्रवास खर्च वाढत होता. सध्या या ठिकाणी असलेल्या लोखंडी पुल धोकादायक झाला आहे. त्यावरून केवळ दुचाकी वाहने ये-जा करू शकतात. अवजड वाहनांसाठी लांबचा वळसा घालून वाहतुक करावी लागत होती. वाहतुक रहदारी सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून या भागात पुल उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती.
त्या मागणीची दखल घेऊन महापालिका मामुर्डी येथील स्मशानमूभीजवळ पवना नदीवर मामुर्डी व सांगवडे जोडणारा पुल बांधत आहे. पुल जलसंपदा विभागाच्या मान्यतेने बांधण्यात येणार आहे. मामुर्डी बाजूकडील जोडरस्त्यासाठी सुधारीत विकास आराखड्यानुसार नदी समांतर रस्ता करण्याचे नियोजन आहे. जलसंपदा परिपत्रकानुसार उच्चतम पुररेषा गृहीत धरू नवीन पुल बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
नव्या आराखड्यानुसार पवना नदीवरील मुख्य पुल 12 मीटर रूंदीचा 90 मीटर लांबीचा असणार आहे. मामुर्डीकडील 12 मीटरचा जोडरस्ता 300 मीटर लांब आहे. सांगवडेकडील 12 मीटरचा जोडरस्ता 130 मीटर लांब आहे. पुलावर विद्युत दिव्याचे खांब बसविण्यात येणार आहेत.
या पुलाच्या कामासाठी महापालिकेने आज निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या 15 दिवसांत 29 म्हणजे फेबु्रवारीपर्यंत ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा 1 मार्चला उघडण्यात येणार आहेत. निविदेचे काम महिन्याभरात संपवून काम सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.