पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू व स्वाईन फ्लू या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १५) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सर्वच पदाधिका-यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक उपयोजना तातडीने राबविण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या.
बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, उषा मुंढे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त विजय खोराटे, अण्णा बोदडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, एम. एम. शिंदे, व्ही. के. बेंडाळे, बी. बी. कांबळे, राजेश भाट, डी. जे. शिर्के, व्ही. आर. तावरे आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत महापालिका व खाजगी रूग्णालयांत डेंग्यू व स्वाईन फ्लूचे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या, डेंग्यू व स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या, सध्या या आजारासाठी प्रत्येक रुग्णालयांत उपलब्ध असलेला औषध पुरवठा व प्रकार, तुटवडा असलेली औषधे, महापालिकेने नागरिकांसाठी राबविलेली जनजागृती मोहिम, रुग्णालयांत उपचारासाठी व रुग्णांसाठी केलेली स्वतंत्र व्यवस्था, या विषयावर चर्चा करण्यात आली.