पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका बेवारस प्राणी व अपघातग्रस्त जखमी पशु, पक्ष्यांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संगोपन केंद्र उभारणार आहे. यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाचा ३५ लाख रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची नुकतीच पुण्यात बैठक झाली. बैठकीत या प्राणी संगोपन केंद्राविषयी चर्चा झाली. संगोपन केंद्र उभारण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत शासनाचा ३५ लाख रुपयांचा निधी २६ एप्रिल २०१७ रोजी पिंपरी पालिकेला उपलब्ध झाला आहे.
या संगोपन केंद्रासाठी पालिकेला एक ते सव्वाएक एकर जागेची गरज आहे.
एमआयडीसी किंवा गायरान जागेवर हा प्रकल्प साकारण्याची तयारी पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत या केंद्राचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. नैसर्गिक अधिवास कायम ठेवून सामाजिक संस्थेमार्फत हे केंद्र चालविले जाणार आहे. प्रथमच असे केंद्र होत असून कुत्रा, मांजर, घोडा तसेच जखमी पशु, पक्ष्यांचा सांभाळ तेथे केला जाईल.