पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील ६६ ठिकाणी जाहीरसभा व कोपरासभा घेता येणार आहेत. त्याशिवाय इतर ठिकाणी सभा घेता येणार नाही. ठरवून दिलेल्या जागेवर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. या दोन मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाहीरसभा व कोपरासभा घेण्यासाठी महापालिकेने मैदान व मोकळ्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत सभा घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे रितसर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अ क्षेत्रीय कार्यालय
निगडीतील अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मोकळी जागा, आकुर्डी येथील खंडोबा मंदिराशेजारी जागा, आकुर्डीतील हनुमान क्रीडांगण, प्राधिकरण-निगडीतील संजय काळे क्रीडांगण, नियोजित महापौर निवासस्थानाची मोकळी जागा, मदनलाल धिंग्रा मैदान, शाहूनगर येथील राजर्षी शाहू महाराज मैदान अशी ठिकाणे आहेत. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत चिंचवड गावातील गोयल गरिमा सोसायटीसमोरील मैदान आणि रावेत येथील डी मार्टसमोरील फुटबॉल मैदान अशी दोनच ठिकाणे आहेत. निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत म्हेत्रे मैदान हे एकमेव ठिकाण आहे.
..
सर्वाधिक ठिकाणे ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत-
क क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक ठिकाणे आहेत. चिखली बसथांबा, बोऱ्हाडे शाळेसमोरील मैदान, रामायण मैदान, रिव्हर रेसिडन्सीजवळील बाळाजी आल्हाट क्रीडांगण, राजे शिवाजीनगर येथील भाजी मंडई मैदान, देवकर वस्ती येथील श्रीकृष्ण मंदिर ही ठिकाणे आहेत. स्पाईन मॉल चौक, इंद्रायणीनगर चौक, क्वॉलिटी सर्कल इंद्रायणी मिनी मार्केट शेजारील मैदान ही ठिकाणे आहेत. उद्यमनगर येथील रसरंग चौक, मासुळकर कॉलनीतील स्केटिंग ग्राउंड, जाधववाडी येथील मैदान, सेक्टर क्रमांक ९ येथील बास्केटबॉल मैदान, सेक्टर क्रमांक १० येथील हॉकीचे मैदान, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम आणि अजमेरा कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल ही ठिकाणे आहेत.
ड क्षेत्रीय कार्यालय
चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिराशेजारी मैदान, पिंपळे सौदागर येथील पालिका शाळेसमोरील शिवछत्रपती क्रीडा संकुल हे ठिकाणे आहेत.
‘ई व ह’ क्षेत्रीय कार्यालय
भोसरी पीएमटी चौक, अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील चौक, लांडेवाडी चौक, भोसरी गावठाण बापुजी बुवा चौक, मोशी येथील शिवाजी महाराज पुतळा चौक, दिघी जुना जकातनाका चौक, भोसरीत तळ्याजवळील मैदान ही ठिकाणे आहेत. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉलशेजारील मोकळी जागा, कासारवाडी येथील सितांगण उद्यानासमोरील मोकळी जागा, संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान या ठिकाणांचा समावेश आहे.