निर्भीडसत्ता न्यूज –
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे व रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागलेला आहे. या मावळ मतदारसंघातील प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मोदी यांना जगतगुरू संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली. यावेळी हिंदुस्थान अँण्टिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांसाठी केंद्र सरकारने १०० कोटी दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच, पनवेल येथील प्रस्तावित विमानतळ, उरण येथील जेएनपीटीचा विस्ताराबाबत चर्चा केली. मावळ मतदारसंघातील रेल्वे आणि संरक्षण विभागाशी निगडीत प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले. तर, क्रांतिवीर चाफेकरांच्या नावाने लवकरच डाक तिकीट प्रकाशित करण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही पूर्ण होत आहे. त्याचे प्रकाशन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे खासदार बारणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे.