निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या अ व फ प्रभाग कार्यलयाअंतर्गत कचरा गाड्यांवरील सफाई कामगारांनी आंदोलक पवित्रा घेत दोन दिवसांपासून कचरा उचलणे बंद केले आहे. दोन महिन्यांपासूनचा पगार मिळावा आणि आरोग्यविषयक साधने मिळण्याची मागणी या कामगारांची आहे.
महापालिकेच्या अ व फ प्रभाग कार्यालयाच्या परिसरात ठेकेदारी पध्दतीने कचरा वाहनांमार्फत कचरा गोळा केला जातो. त्यासाठी ठेकेदारामार्फत नियुक्त ९० गाड्यांवरील कंत्राटी वाहनचालक व १८० कचरावेचक कामगारांनी हा बंद पुकारला आहे. मागील दोन दिवसांपासून हे कचरा वाहतूक करणा-या वाहनांवरील चालक व कामगारांनी कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला आहे. निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवनासमोर आंदोलन सुरु होते. या दरम्यान, महापालिकेच्या सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी काम बंद करणा-या कामगारांना कामावरून काढण्याचा इशारा दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र झाले. या कामगारांनी अ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन कर दुरगुडे यांचा निषेध केला.
दोन महिन्यांपासून पगार मिळावा, आरोग्यविषय सुरक्षा साधने पुरवावीत आणि तिन महिन्यातून कामगारांची आरोग्य तपासणी व्हावी, अशा मागण्या कामगरांनी केल्या आहेत.