निर्भीडसत्ता न्यूज –
नाशिकफाटा येथील जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपुलाजवळ पुण्याकडून पिंपळेगुरवकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग तयार झाला आहे. कासारवाडीतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा रॅम्प तातडीने खुला करण्याची मागणी नगरसेवक शाम लांडे यांनी केली आहे.
शाम लांडे यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुण्याहून पिंपळेगुरवकडे जाणा-या या रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. तो रॅम्प अजूनही वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. त्यामुळे कासारवाडीतील रेल्वेगेटवर वाहतुकीची ताण येत आहे. तो कमी करण्यासाठी पिंपळेगुरवकडे जाणारा हा रॅम्प तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, रहाटणी या भागातील नागरिकांसाठी हा रॅम्प सुरू होणे गरजेचे आहे. पालिकेने तो रॅम्प लवकरात लवकर सुरू करावा, अन्यथा कासारवाडीतील नागरिकांकडूनच तो सुरू केला जाईल, असे लांडे यांनी म्हटले आहे.