चल ग सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला |
ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरात नागपंचमी उत्साहात साजरी झाली. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.
नागपंचमीला घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते. घरात नागाची पुजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहिल म्हणुन बाहेर जाऊन वारुळाचीसुध्दा पुजा केली जाते. नागोबाची पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात.
शेतकरी या दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतात नांगर देखील फिरवत नाही.
श्रावणी सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी सारखे खेळ खेळतात. झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. नववधुंना मोकळेपणाने खेळता यावे, मन मोकळे करता यावे यासाठी पंचमीच्या दिवशी झोपाळे बांधले जातात. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग आहे.