निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक कार्यतत्पर झाले आहेत. त्यातून शहरात शैक्षणिक क्रांतीला आता खरी सुरुवात झालीअसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
भाजपचे खासदार, आमदार व सर्व नगरसेवक महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सरसावले आहेत. या सर्वांनी प्रत्येकी एक महापालिका शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची पिंपरीगावात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेवक उत्तम केंदळे आदी या वेळी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, महापालिका शाळांतील गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. असे शिक्षण देणे सहज शक्य आहे. शिक्षकांनी मनावर घेऊन चांगले शिक्षण दिल्यास गोरगरीब विद्यार्थी पुढे जाऊन शहराचे नावलौकिक करतील. त्यामुळे शिक्षकांचेही नाव आपोआप मोठे होणार आहे.
भाजपचे सर्व नगरसेवक शिक्षकांना सर्व सहकार्य करतील. महापालिका शाळांतील दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करतील. परंतु, शिक्षकांनी स्वतःला झोकून देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण द्यावे. भविष्यात सर्वसामान्यांना आपल्या मुलाला शिक्षणासाठी महापालिका शाळेत पाठविष्याची इच्छा व्हावी एवढे चांगले काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.