निर्भीडसत्ता न्यूज –
राज्यातील चांगली कामगिरी करणा-या खेळाडूंना शासकीय नोक-यांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा प्रस्ताव क्रीडा व युवक संचलनाय, पुणे कार्यालयाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठवला आहे. त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (दि. २) विधानसभेत केली आहे.
मुंबईमध्ये विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील खेळाडुंच्या मागण्यांसाठी आमदार लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले. आमदार लांडगे म्हणाले की, अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविणा-या खेळाडुंना त्यांच्या दर्जानुसार गट ब, क आणि ड संवर्गातील पदांसाठी शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येईल. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने ३० एप्रिल २००५ रोजी घेतला आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव ३० मे २०१७ रोजी क्रीडा व युवक संचलनालय, पुणे कार्यालयाकडून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, अनेक खेळाडू आरक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करुन संबंधित प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.