पिंपरी-चिंचवड प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, शंकर नगर, परशुराम नगर महात्मा फुलेनगर या झोपडपटयांचा भाग येतो. वीस हजारांहून अधिक या ठिकाणी लोकसंख्या आहे. दाट लोकवस्तीचा प्रभाग असल्याने या परिसरातून महापालिकेने पीएमपीएमएल बससेवा सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली आहे.
तुषार हिंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात महापालिकेची बससेवा अद्याप सुरू नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने कित्येक वर्षे येथून एकही बस सुरु केली नाही. गोरगरीब सर्व सामान्य नागरिकांना रिक्शा वेतिरिक्त दूसरी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे संत तुकारामनगर येथिल यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) ला जाण्यासाठी नागरिकांना पीएमपीएमएल बससेवा सुरु करावी.
बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थिनींना तसेच वयोवृद्ध नागरिकांना बस साठी पायपीट करवी लागत आहे. त्यासाटी पीएमपीएमएलने विद्यानगर येथून संघवी केसरी कॉलेज, चिंचवड स्टेशन व पिंपरी चौकमार्गे वायसीएम रुग्णालय अशी बससेवा नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करावी, असे हिंगे यांनी म्हटले आहे.