निर्भीडसत्ता न्यूज –
सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅपियनशिप क्रीडा स्पर्धेत निगडी येथील श्रेया शंकर कंधारे हिने १६ वर्षे वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावत भारताचा तिरंगा उंचावला आहे. आठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगपटूंना नमवत तिने ही कामगिरी केली आहे. निगडी प्राधिकरणात मिरवणूक काढून तिचे स्वागत करण्यात आले.
या कामगिरीबद्दल श्रेयाचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, कुंदन गायकवाड, भिमाबाई फुगे, शर्मिला बाबर, श्रेयाचे वडील आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू, गुरुकुल कुस्ती संकुलाचे संस्थापक शंकर कंधारे, भारत केसरी विजय गावडे, मुळशी युवासेनेचे अध्यक्ष राम गायकवाड आदी उपस्थित होते. महापौर नितीन काळजे म्हणाले, योगा स्पर्धेत श्रेया हिने दोन सुवर्णपदके मिळवून शहराची मान उंचावली आहे. योगा स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंना पालिका आर्थिक सहकार्य करेल. त्यांनी श्रेयाचे कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
श्रेयाचे पुणे विमानतळावर गुरुवारी (दि. ३) सकाळी आगमन झाल्यावर महापालिका क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी तिचे तेथे जाऊन स्वागत केले. यावेळी नगरसेविका भिमाबाई फुगे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे उपस्थित होते.