निर्भीडसत्ता न्यूज –
रखलेले प्रकल्प, प्रलंबित प्रश्न आणि प्रभागातील समस्याबाबत राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार महापालिकेचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत शुक्रवारी (दि. २९) पवार ही बैठक घेणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.
महापालिकेत सत्तांतर होऊन सहा महिने उलटले आहेत. त्यानंतर पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पवार आयुक्तांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत भक्ती-शक्ती उड्डाणपूल, तिरंगा ध्वज, भोसरी, थेरगाव, जिजामाता रुग्णालय, संत ज्ञानेश्वर, नामदेव भेट शिल्प, संभाजीनगर बस टर्मिनल, तळवडे पार्क, घरकूल प्रकल्प, संतपीठ, डेअरी फार्म, हॅरिष ब्रीज उड्डाणपूल या प्रकल्पांचा पवार आढावा घेणार आहेत. नवीन गावांमधील आरक्षणांचे भूसंपादन, बीआरटी मार्ग, अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रिंगरोड याबाबतही अजित पवार यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.
मेट्रो निगडीपासून कात्रजपर्यंत करण्याची राष्ट्रवादीची मागणी आहे. नगरसेवकांकडून त्याचे समस्या लेखी स्वरुपात मागविण्यात आल्या आहेत. प्रमुख समस्यांवरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे बहल म्हणाले.