निर्भीडसत्ता न्यूज –
स्वत:च्या रुग्णालयातील परिचारिकेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका डॉक्टरवर अनुसुचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवडे येथील सद्गुरु रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे.
डॉ. सुशील सिंघवी असे या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी परिचारिका पल्लवी सुनील गायकवाड (वय २१, रा. ओटास्किम, निगडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सिंघवी यांचे तळवडे त्रिवेणीनगर येथे सद्गुरु रुग्णालय आहे. यामध्ये पल्लवी गायकवाड परिचारिका म्हणून काम करतात. गायकवाड यांच्या वेतनातून सलग दोन महिन्यांपासून सोळाशे रुपयांची विनाकारण कपात केली जात होती. त्यामुळे माझ्या वेतनातून ही रक्कम कपात करु नका, अशी मागणी गायकवाड यांनी डॉ. सिंघवी यांच्याकडे केली. यावर सिंघवी यांनी गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.