निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे-नाशिक महामार्गाच्या 90 मीटर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी चर्चा केली आहे. त्यासंदर्भात आमदार लांडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. नाशिक रस्त्याचे 90 मीटर रुंदीकरण झाल्यास नागरिकांना कमी वेळेत नाशिकला जाता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पिंपरी-चिंचवड दौ-यावर होते. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी नाशिकरोडच्या रुंदीकरणाचे काम करण्याची विनंती गडकरी यांच्याकडे केली. यावेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार या वेळी उपस्थित होते.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम मंचरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्याच्यापुढे काम रखडले आहे. आळेफाटा ते नाशिक रोड 90 मीटर रस्त्याचे रुंदीकरण आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास दोन तासात नाशिकला जाणे शक्य होईल. नागरिकांचा वेळ वाचेल. आता चार ते पाच तास लागतात, असेही महेश लांडगे म्हणाले.
पवना धरणातून जलवाहतूक सुरु करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिका-यांनी केली. मुंबईत नऊ डिसेंबर रोजी पाण्यावर विमान उतरविण्याचे प्रात्यक्षिक होणार आहे. ते प्रात्यक्षिक पाहण्याचे निमंत्रण गडकरी यांनी दिले आहे. त्यानंतर पवना धरणातून जलवाहतूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.