अपंगांसाठीच्या पेन्शन योजनेला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ यांचे नाव
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अपंगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शहरातील 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना वयाच्या पाचव्या वर्षांपासून दरमहा दोन हजार रुपये ‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत अपंगांना पेन्शन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अपंगांना आर्थिक उत्पन्नाची कोणतीही अट नाही. अपंग हा लाभार्थी व्यक्ती शहरात किमान तीन वर्षांपासून वास्तवास असावा ही अट असणार आहे. हा ठराव उपसूचनेसह सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
‘पंडित दिनदयाल उपाध्याय’ पेन्शन योजनेचे नाव असणार आहे. या योजनेसाठी अंधांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. या योजनेस पंडित उपाध्याय अपंग कल्याणकारी योजना असे नाव द्यावे. पेन्शन दीडवरून दोन हजार रुपये करावी. वयाची अट पाच वर्षांवरील करावी अशी उपसूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडली. नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्याला अनुमोदन दिले. महापौरांनी उपसूचनेसह हा विषय मंजूर केला.
महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. 40 आणि त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींना वयाच्या पाचव्या वर्षांपासून पेन्शनचा लाभ मिळणार आहे. शहरात एक हजार 804 अंपगांची नोंद असून या योजनेसाठी तीन कोटी 24 लाख रुपये खर्च येणार आहे.