निर्भीडसत्ता न्यूज –
कर्मचारी महिलेची छेड काढल्याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीनंतर देखील कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी या अधिका-यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे छेड काढणा-या या अधिका-याला पालिका प्रशासन संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी केला आहे.
आमदार चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी या अधिका-याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार एका कर्मचारी महिलेने केली आहे. त्या तक्रारीसाठी काही महिने चौकशी करून विशाखा समितीने पालिका प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. तरी देखील पालिकेने कुलकर्णीवर कारवाई केलेली नाही.
त्यातून कर्मचारी महिलेची छेड काढणा-या अधिका-याला पालिका संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होते. त्याबरोबर महिला कर्मचा-यांच्या सुरक्षा व अधिका-रांची पायमल्ली जाल्याचा संदेश गेला आहे, असा आरोप करीत विशाखा समितीच्या अहवालाबाबत लेखी खुलासाही आमदार चाबुकस्वार यांनी मागितला आहे.