महू हातगेघर धरणाच्या कामासाठी आंदोलन करण्यामागे वसंतराव मानकुमरेंचे राजकारण काय?
मेढा / प्रतिनिधी – सोमनाथ साखरे
निर्भीडसत्ता न्यूज –
महू हातगेघर धरणाच्या कामासाठी आंदोलन करण्यामागे वसंतराव मानकुमरे यांचे नेमके राजकारण कोणते ? असा सवाल करीत मानकुमरे यांच्या भागात मी भाजपच्या माध्यमातून कामे करीत असल्यानेच वसंतरावांच्या पोटात दुखत असल्याची बोचरी टीका भाजपचे दीपक पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या काळातही धरणाचे काम ठप्प होते, असे सांगत दीपक पवार यांनी मानकुमरे व आमदार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
महू हातगेघर धरणाच्या कामाबाबत झालेल्या आंदोलन व काम बंद बाबत खुलासा करण्याबाबत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते, विष्णू बेलोशे, संजय सपकाळ,श्रीकांत गोळे, बुवा पिसाळ, सुनील तांबे, सर्जेराव मर्ढेकर,सचिन मोहिते, हणमंतराव पवार आदी यावेळी उपस्थित होते.
दीपक पवार म्हणाले की, महू हातगेघर धरणाबाबत वसंतराव मानकुमरे यांचे आंदोलन हे धरणग्रस्तांना फसवत असून मी या कामाबाबत जेंव्हा भूमिपूजन केले तेंव्हा या भागातील शेतकरी हजर होते, याबाबत २०७७ कोटीचे काम होणार असून यापैकी ४० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, तसेच यासाठी येत्या २४ तारखेला महू येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे, त्यावेळी धरणग्रस्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या १७ वर्षात या धरणाचे केवळ राजकारण करण्याचा उद्योग झाला आहे, पुनर्वसनाच्या कामात देखील केवळ राजकारण केले आहे. हे धरण निकषात बसत नसतांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषात बसवत या धरणाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
वसंतराव मानकुमरे हे केवळ राजकीय हेतूने आंदोलन करीत आहेत, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या काळात देखील या धरणासाठी निधी उपलब्ध झाला नाही, या वेळी जमिनी कागदोपत्री नोंदवत पुनर्वसनाचे कागदी घोडे नाचले आहेत काय याबाबतदेखील सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
मी वसंतरावांच्या भागात विकास कामे करीत असल्यानेच त्यांच्या पोटात दुखत असल्याची बोचरी टीकाही पवार यांनी केली. तसेच या धरणाच्या बाबत कसे राजकारण केले हे रामराजेंना विचारा असेही सांगितले. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण का केल्या नाहीत, यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या इथे वादग्रस्त वक्तव्य करीत आंदोलन करणारे वसंतराव यांचा केवळ हा फार्स असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी केली.