निर्भीडसत्ता न्यूज –
सहकारी महिला कर्मचा-याची छेड काढल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्या दोन वेतनवाढ आयुक्तांनी रोखल्या आहेत. तसेच यापुढे कोणत्याही स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार एका कर्मचारी महिलेने केली आहे. त्या तक्रारीसाठी नेमलेल्या विशाखा समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दोन महिन्यापूर्वी अहवाल सादर केला होता. त्यामध्ये कुलकर्णी यांना दोषी ठरविण्यात आले होते. तरीही, कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी चालढकल केली जात होती, असा आरोप केला जात होता.
त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज कुलकर्णी यांच्यावर कारवाई केली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील 13 (3) (1) चा, तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम तीनचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे कोणत्याही स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येणार आहे.