निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेत आयुक्तांच्या दालनात शहरातील वाहतूक समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, राजेंद्र भामरे, नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे आदी उपस्थित होते. यावेळी वाहतूक शाखेच्या पोलीसांना महापालिकेकडून 30 जामर, 30 वॉकीटॉकी देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बैठकीत शहरातील सर्व सिग्नल यंत्रणा लेफ्ट फ्री करण्यात येणार आहेत, तसेच शहरातील सर्व सिग्नल व्यवस्थेला अडथळा ठरणारे झाडे, फ्लेक्स बोर्ड आणि इतर कारणांनी झाकले गेलेले ते काढण्यात येणार आहे. शहरात विविध ठिकाणी पडून असलेली बेवारस वाहने ताब्यात घेतली जाणार आहेत. शहरातील मोठ्या वाहतूकीच्या रस्त्यावरील बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील अनेक ठिकाणी वाहने तोडफोडीच्या अथवा जाळपोळ या सारख्या घटना प्रामुख्याने वाहने पार्किंगच्या कारणाने होताना दिसतात. त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
पिंपरी कॅम्प, भोसरी-आळंदीरोड, आकुर्डी, निगडी गावठाण रोड आदी ठिकाणी सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असते. त्याठिकाणी जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. त्या वाहनांना सायंकाळी नो ऍन्ट्री केली जाणार आहे. सार्वजनिक वाहतुकींचा जास्तीत जास्त नागरिकांना वापर करावा, याकरिता व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच बीआरटीएस मार्गावरुन यापुढे खासगी वाहनांना प्रवेश निशिध्द करण्यात येणार आहे. तसेच तीन चाकी रिक्षांमध्ये बदल करुन व्यवसाय करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहेत.