निर्भीडसत्ता न्यूज –
पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे आज सकाळी ९ वाजता मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. निर्माते अशोक पंडित यांनी गीता यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक म्हणाले की, ‘आम्ही आमच्यापरिने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी ९ वाजता गीताजी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत होत्या. पण या वर्षभरात कोणीच त्यांना भेटायला आले नाही. त्यांना बरं वाटावं म्हणून गेल्या शनिवारी आम्ही ग्रॅण्ड ब्रेकफास्टचे नियोजनही केले होते. त्या व्यवस्थित होत्या, पण आतून त्या आनंदी नव्हत्या. गीताजी यांना त्यांच्या मुलांना शेवटचे पाहायचे होते. पण त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. कारण त्यांना भेटायला वर्षभरात कोणीच आले नाही. आज सकाळी ९.०० वाजता वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.
वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला. त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला. गीता कपूर यांना २१ एप्रिल २०१७ रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा राजा याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला आणि पुन्हा आलाच नाही.