निर्भीड न्यूज –
नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी आनंदी जेष्ठत्व योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जेष्ठांची नाव नोंदणी करण्यात येत असून, दि. 22 मेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पिंपळे सौदागर येथील शिवार रोडवरील शुभश्री वुडस हाऊसिंग सोसायटी येथील दत्त मंदिर आणि नाना काटे यांच्या पिंपळे सौदागरमधील काटेनगर येथील जनसंपर्क कार्यालयात जेष्ठांची नावनोंदणी करण्यात येत आहे.
नगरसेविका शितल विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शंकर काटे, सुनील काटे, अर्जून काटे, पोपट जगताप, अविनाश गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
नाना काटे या वेळी म्हणाले की, जेष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचे जगणे असह्य होते. त्यामुळे आरोग्य सुविधा सहज आणि कमी दरात किंवा मोफत उपलब्ध होणे आवश्यक आहे. आनंदी जेष्ठत्व या योजनेतून अशा जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आनंदी जेष्ठत्व या योजनेंतर्गत नावनोंदणी करण्यात आलेल्या जेष्ठांना नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत सभासद कार्डही प्रदान करण्यात येणार आहे. आरोग्य विषयक सल्ला, वैद्यकीय सेवा, 24 तास मदत केंद्र, सहली आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम, औषधे, रुग्णवाहिका, बँकींग सेवा, समुपदेशन आदी सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत; तसेच या सेवा पुरविणाऱ्या संस्थांची यादीही प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जेष्ठांनी या योजनेंतर्गत नावनोंदणी करून, या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही नाना काटे यांनी या वेळी केले.