रणबीर कपूर आणि अलिया भट यांच्यातली जवळीक अधिक वाढत चालली आहे, हे आता पुन्हा एकदा सर्वांच्या ध्यानात आले आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीच्या “गुफ्तगू’ची खूप चर्चा आहे. आतापर्यंत रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तारखा ठरल्याच्या वावड्या उठायला लागल्या होत्या. भट आणि कपूर दोन्ही खानदानांकडून या नात्याला हिरवा सिग्नल मिळाला आहे. आता बॉलिवूडमध्ये या जोडीला चिडवायलाही सुरुवात झाली आहे.
त्यात पहिला नंबर लावला आहे अभिनेत्री काजोलने. नेहा धुपियाचा शो “नो फिल्टर नेहा’ लवकरच सुरू होतो आहे. काजोलही या शो मध्ये सहभागी होण्यास पोहोचली होती. या शो दरम्यान नेहाने काजोलला अलियाशी संबंधित एक प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देताना काजोलने अचानक आणि नकळतपणे आलियाचा उल्लेख “अलिया कपूर’ असा केला. पण दोनच सेकंदात तिला आपली चूक उमगली आणि तिने स्वतःला सावरले. “सॉरी सॉरी, अलिया भट….’ असे म्हणत तिने पुढे उत्तर द्यायला सुरुवात केली. काजोलच्या या चूकीवर नेहा धुपियाला मात्र हसणे आवरता आवरेना. अलिया आणि रणबीर सध्या “ब्रम्हास्त्र’मध्ये एकत्र काम करत आहेत.