निर्भीडसत्ता न्यूज ।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प हा इलिव्हेटेड असणार आहे. सद्यस्थितीत मेट्रोचे पिलर उभारण्याची ठिकाण निश्चित करण्यासाठी जीओ टॅगिंग आणि आराखडा करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष मेट्रोचे काम सुरू करण्याचा विश्वास पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने यापूर्वीच पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गास आणि स्थानकांना मान्यता दिली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग 23.3 किलोमीटर लांबीचा असून एकूण 23 स्थानके असणार आहेत. हा प्रकल्प राज्य शासनाने 18 जुलै 2018 रोजी महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहेत. टाटा व सिमेन्स ही कंपनी पीएमआरडीए मेट्रोचे काम करण्यास पात्र ठरली आहे. या कंपनीकडून मेट्रो प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोचे पिलर उभारण्यासाठीचा आराखडा त्याचबरोबर पिलर उभारण्याचे ठिकाण याची निश्चितीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जीओ टॅगिंग केले जात आहे.
मेट्रो प्रकल्पाची वैशिष्टे
हिंजवडी ते शिवाजीनगर 23 किलोमीटर मार्ग
मेट्रो मार्गावर 23 स्थानके
संपूर्ण मेट्रो इलिव्हेटेड असणार
एकूण प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी रुपये