निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांची गुरूवारी (दि. १६) निवड करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडीची पत्रकार परिषदेत घोषणा केली.
मावळते शहराध्यक्ष व चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री विनोद तावडे, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा कोणा एकाचा पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात बुथ अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने केली जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये बुथ अध्यक्षांची निवड पार पडल्यानंतर मंडल अध्यक्षांची निवडणूक पद्धतीने निवड करण्यात आली. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी आज निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
शहराध्यक्ष निवडीसाठी पक्षातील सर्व पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांनी या पदासाठी आमदार महेश लांडगे यांचे नाव सुचविले. त्यानुसार महेश लांडगे यांची पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. निवडीनंतर आमदार लांडगे यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. हा पक्ष कार्यकर्त्यांचा असल्यामुळे सर्वांना सोबत घेऊन कारण्यास त्यांना सांगण्यात आले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.