पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा कार्यकाळ दोन वर्षांवरून एक वर्षांचा करून अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. गेल्या वर्षी बंद केलेली ही पद्धत पुन्हा यंदा सुरू केली जाण्याची दाट शक्यता आहे.
फेबु्रवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचे कारभारी आले. महापालिका नियमानुसार स्थायी समिती सदस्याचा कार्यकाळ 2 वर्षांचा आहे. हे पद सर्वांधिक लाभाचे असल्याने अनेक नगरसेवक त्या पदासाठी इच्छुक असतात. या पदाचा लाभ अधिकाधिक नगरसेवकांना मिळावा म्हणून सत्ताधारी भाजपने दोन वर्षाचा कालावधी कमी करून तो एक वर्ष केला. त्याची अंमलबजावणी फेबु्रवारी 2018 ला झाली. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी 2019 ला त्या पद्धतीचा अवलंब सत्ताधार्यांनी केला नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना 2 वर्षांचा कालावधी मिळाला.
मात्र, यंदा पुन्हा समिती सदस्याचा कार्यकाळ 1 वर्षांचा करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे पंचवार्षिकेत शिल्लक राहिलेल्या 2 वर्षांचा कालावधीत 12 ऐवजी तब्बल 22 नगरसेवकांना समिती सदस्य मिळू शकते.